‘खेळाडूंना 11 कोटी देण्याची गरज नव्हती’; विजय वडेट्टीवार यांचा घणाघाती आरोप
इंडियन क्रिकेट टीमला 11 कोटी देण्याची गरज नव्हती असे मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे. तसेच सभागृहात दुष्काळाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी खोटी माहिती दिली. दुष्काळात पंधरा हजार कोटी दिल्याचे त्यांनी खोटे सांगितले असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी आज विविध विषयांवर भाष्य केले आहे.
11 कोटी देण्याची काहीच गरज नव्हती
राज्याचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामध्ये खेळाडूंचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यांना 11 कोटी रुपयांचे बक्षिस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी कौतुक केले. तर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. दरम्यान, यावर विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे. वडेट्टीवार म्हणाले, ” इंडियन क्रिकेट टीमला 11 कोटी देण्याची काहीच गरज नव्हती. आपले क्रिकेटर आपल्या देशासाठी खेळतात पैशांसाठी खेळत नाहीत. मुंबईतील खेळांडूंना 1 कोटींचे बक्षीस दिले ते चांगलेच आहे. खेळाडूंना प्रोत्साहन दिले पाहिजे,” अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली.
शेतकऱ्यांच्या बाबतीत हे पाप करू नये
ते म्हणाले, ”दुष्काळात पंधरा हजार कोटी दिल्याचे त्यांनी सांगितले. खोटा नॅरेटिव्ह त्यांनी सेट केला. आमच्याकडे 4 हजार 600 कोटी दिल्याचे पुरावे आहेत. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. खोटे बोलून मते घ्यायचा त्यांचा धंदा आहे. मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत तरी त्यांनी हे पाप करू नये. त्यांनी समोर यावे आम्हीही सामना करायला तयार आहोत”, असे आव्हान वडेट्टीवार यांनी केले आहे.