कॉलेज ट्रस्टच्या सर्वसाधारण सभेत सुधीरकुमार माळी व निखिल तुरखीया यांचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द
सन 1997 नंतर तब्बल 27 वर्षानंतर प्रथमच झाली सर्वसाधारण सभा
तळोदा
अध्यापक शिक्षण मंडळ द्वारा संचलित आर्ट्स व कॉमर्स कॉलेज ट्रस्ट तळोदे या संस्थेची सर्वसाधारण सभा ही संस्थेचे अध्यक्ष भरतभाई माळी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 21 जुलै 2024 वार रविवार रोजी मुख्य इमारतीत घेण्यात आली. या सभेला कॉलेज ट्रस्टचे माजी अध्यक्ष चुनीलाल मुरार सूर्यवंशी यांच्यासह जेष्ठ सभासद मोठ्या संख्येने हजर होते.
सर्वप्रथम आलेल्या सर्व सभासदांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष भाईसाहेब गो.हू. महाजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर परिसरात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या ट्रस्टच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली व पुढील कामकाजात सुरुवात करण्यात आली.
या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे 1997 मध्ये झालेल्या सभेत कॉलेज ट्रस्टचे संस्थापक दिवंगत प्राचार्य भाईसाहेब गो.हू.महाजन यांनी सर्वसाधारण सभेत मत मांडले होते की, पुढील होणारी सभा ही भयमुक्त वातावरणात विना पोलीस बंदोबस्तात झाली पाहिजे या सूचनेला 27 वर्षानंतर खऱ्या अर्थाने सभेद्वारेच न्याय देण्याचे काम भरतभाई माळी यांनी केले आहे. तसेच उपस्थित सर्व सभासदांच्या संमतीने सभेत अनेक महत्त्वपूर्ण विषयांना चालना देण्यात आली व महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले.
त्यामध्ये मागील सभेतील इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. ट्रस्टच्या जमा-खर्च अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली., सनदी लेखापाल यांची नियुक्ती करून मानधन ठरविण्यात आले., कार्यकारी मंडळाच्या दिनांक 6 जुलै 2003 रोजी चा ठराव क्रमांक 3 नुसार सुधीरकुमार माळी व निखिलकुमार तुरखीया यांनी दाते वर्गातून सभासदांची फसवणूक व दिशाभूल करून प्रमुखदाते या प्रवर्गातून प्रतिनिधित्व केल्याने त्यांचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. व लक्ष्मण बबनराव माळी तसेच रोहित भरतभाई माळी यांनी ट्रस्टला प्रत्येकी 11 लाख 11 हजार 111 रुपयांची मोठ्या स्वरूपाची भरीव देणगी दिल्याने त्यांचे सभासदत्व कायम करण्यात आले.
तसेच सन 2024 ते 2029 या कार्यकाळासाठी प्रमुखदाते, दाते,आश्रयदाते, सहानुभूतीदार, आजीव सदस्य अ, ब,क अशा वेगवेगळ्या श्रेणीतील प्रतिनिधींची निवड करण्यात आली.
यानंतर उपस्थित सर्व सभासदांनी नवनियुक्त कार्यकारी मंडळाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच शहादा- तळोदा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी हे पक्ष अधिवेशनासाठी पुणे येथे असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत तरी त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे नवनियुक्त प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या.