जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था;रस्ते दुरुस्ती करा – बिरसा आर्मी
या मार्गावरील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था;नवापूर ते खांडबारा;तळोदा ते धडगाव,तळोदा ते नंदुरबार

तळोदा
जिल्ह्यात बऱ्याच मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे.यासाठी बिरसा आर्मीने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,ग्रामीण भागातील रस्ते खेड्यांना जोडणारे एक महत्वाचे साधन आहे.नवापूर ते खांडबारा या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यात बऱ्याच ठिकाणी खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही.बऱ्याच ठिकाणी रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडले आहेत.परिसरातील अनेक गावांचे खांडबारा हे मुख्य बाजार पेठ आहे.नवापूर ते खांडबाऱ्याकडे जातांना मोरोड,देवमोगरा,पालीपाडा,शेही,निजामपूर,नगारे,मैलीपाडा,श्रावणी व इतर गावासह हजारों नागरिक दररोज आपला जीव धोक्यात घालून खडतर प्रवास करतात.
अशीच परिस्थिती तळोदा ते धडगाव,व तळोदा ते नंदुरबार रस्त्याची ही आहे.ही रस्ते जिल्ह्यातील तालुक्यांना जोडणारे मुख्य रस्ते असतांना देखील खड्डेमय,दयनीय परिस्थिती आहे.वारंवार निवेदने,आंदोलने करूनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करतांना दिसत आहे.रस्ता तयार होऊन दोन-तीन वर्षेही होत नाही;तोवर बरीच रस्ते खड्डेमय होतात.त्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो.
असे निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात;याला जबाबदार कोण?या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था होऊन देखील नेते,अधिकाऱ्यांचे एवढे दुर्लक्ष कसे?नेते,अधिकारी त्यास रस्त्याने ये-जा करतात.त्यांना काहीही वाटत नाही का?असे प्रश्न उपस्थित केले आहे.लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.अन्यथा,तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर बिरसा आर्मीचे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,धडगाव तालुकाध्यक्ष अजय वळवी,सुरपा नाईक,जितेंद्र वसावे,राकेश वसावे,अजय पटले,सचिन वळवी आदी.कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.