
तळोदा
येथील नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिरातील शिक्षक रविंद्र गुरव यांना शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
गुरव यांचा माध्यमिक विभागात राज्यात प्रथम क्रमांक आला असून त्यांना पन्नास हजार रुपये, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप प्रदान करण्यात आले. याआधी देखील गुरव यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे च्या महात्मा फुले सभागृहात या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी आजच्या आधुनिक काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधुनिक तंत्रामुळे डिजिटल शिक्षणाला वेगळेच महत्व निर्माण झाले आहे. शिक्षक व विद्यार्थी या दोन्ही घटकांना प्रेरित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी ही दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली. राज्यातील अनेक शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घेतला, ही आनंददायी बाब आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची पुढील वर्षापासून अंमलबजावणी होत आहे. नवीन शैक्षणिक धोरणात आधुनिक तंत्रज्ञानाला महत्व देण्यात आले आहे. शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान अवगत केल्यास शिक्षणाचा दर्जाही अधिक सुधारेल. अशा तंत्रस्नेही शिक्षकांमुळे दर्जेदार व गुणवंत विद्यार्थी घडतील, असा आशावाद शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

यावेळी शालेय शिक्षण प्रधान सचिव श्रीमती आय ए कुंदन शिक्षण आयुक्त सुरज मांढरे शिक्षण मांढरे शिक्षण संचालक राहुल खेरवार आदी उपस्थित होते.
गुरव यांच्या यशनिवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखीया संचालिका सोनाभाभी तुरखीया उपाध्यक्ष डी एम महाले सचिव संजयभाई पटेल समनव्यक हर्षिलभाई तुरखीया मुख्या. पुष्पा बागुल प्राचार्य सुनिल परदेशी प्रिन्सिपल पी डी शिंपी मुख्या. श्रीमती भावना डोंगरे मुख्या.गणेश बेलेकर उप प्राचार्या कल्याणी वडाळकर सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी कौतुक केले.