नंदुरबार

पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर, दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत

म्हशीला पाण्यातून बाहेर काढतांना दुर्दैवी घटना

नंदुरबार
सख्खे भाऊ सापडले मृत्यूच्या जबड्यात! म्हशीला वाचवताना
कुटुंबावर शोककळा.
अधिक माहिती अशी कि,
रनाळे शिवारातील शेतालगत सटवाईबारीपाडा नाल्याच्या पाण्यात उतरलेल्या म्हशी बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. पोळ्याच्या पूर्वसंध्येलाच शेतकरी कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील रनाळा येथे घडली. यातील मृत ज्ञानेश्वर धात्रक याचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता, त्याची लग्नाची तारीख ही ठरली होती. दरम्यान तरुण भावंडांच्या मृत्यू झाला त्या ठिकाणाहून 200 मीटर अंतरावर वडील काम करत होते. रात्री उशिराने दोन्ही भावांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.
रनाळा येथील शेतकरी दगा धात्रक यांची परिस्थितीत सर्वसामान्य आहे. गरिबीतून आता कुठे चांगले दिवस यायला सुरुवात झाली होती. त्यांचे दोन मुले म्हशी चारुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लावत होते.
दि.01 सप्टेंबर रोजी दोघे जण नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी गेले होते. दगा धात्रक यांच्या रनाळे शिवारातील शेतालगत सटवाईबारीपाडा बंधारा आहे. त्यालगतच्या नाल्यात त्यांच्या म्हशी चरत असताना पाण्यात गेल्या. बराच वेळ उलटूनदेखील काही केल्या म्हशी बाहेर येईना.
यामुळे विक्की धात्रक (22) हा म्हशींना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. मोठा भाऊ ज्ञानेश्वर धात्रक (25) याच्या लक्षात आल्याने तो भावाला वाचविण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र, दोघे जण पाण्यात बुडाले. सदरची बाब काठावर बसलेल्या तीन लहान मुलींच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड करुन परिसरातील नागरिकांना माहिती दिली.
लगेचच लगतच्या शेतातील शेतकरी व मजुरांना समजल्यावर मदतीसाठी धावपळ झाली. परंतु, तोपर्यंत दोघे जण पाण्यात बुडाले होते. यामुळे परिसरातील काहींनी पाण्यात उड्या घेत त्यांचा शोध घेतला. मात्र, तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. दोघा भावांचा मृतदेह पाहून कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. ऐन पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकरी कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दोघांचे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले व रात्री उशिराने शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रविण चव्हाण परिवर्तन 24 न्युज नंदुरबार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button