स्थायी समितीची सभा कोरम अभावीच तहकूब; विरोधक पुन्हा घेताहेत खोट्याचा आधार : जि.प.अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित

नंदुरबार – नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेऊन आम्ही अधिकृतपणे मंजूर केलेल्या विकास कामांना थांबवण्यासाठी एकीकडे आमचे विरोधक न्यायालयात धाव घेतात आणि आज केवळ कोरम अभावी स्थायी समितीची सभा होऊ शकली नाही यावरून गळे काढतात. यावरूनच आमच्या विरोधकांचा ढोंगीपणा किती आणि जनतेची निष्ठा किती हे उघड होत आहे. काहीही करून जनतेची दिशाभूल करण्याचा खोटारडेपणा करणाऱ्या अशा विरोधकांच्या प्रचाराला कोणीही बळी पडू नये; असे जाहीर आवाहन नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी केले आहे.
सर्वसाधारण सभेत अधिकृतपणे संमत केलेल्या विकास कामांच्या विरोधात या विरोधकांनी न्यायालयात धाव घेतली तेव्हा न्यायालयानेच यांची ती निराधार याचिका खारीज करून फेटाळून लावलीय. तेव्हापासून यांची मानसिकता जास्त बिघडली आहे आणि त्यामुळेच आजच्या स्थायी समितीच्या तहकूब होण्याचे भांडवल करीत आहेत, असेही डॉक्टर सुप्रिया गावित यांनी म्हटले आहे.
दिनांक 11 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती, परंतु कार्यालयीन कामाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांना स्वतःला बाहेरगावी दौऱ्यावर जावे लागले. त्या व्यस्तते मुळे त्यांना स्वतःला नंदुरबार जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहता आले नाही. सत्ताधारी गटातील काही सदस्यांना सुद्धा वैयक्तिक व अन्य कारणांनी स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहता आले नाही. परिणामी कोरम अभावी स्थायी समितीची सभा हकूब झाली. हे वास्तव तांत्रिक कारण सर्वांसमोर असताना विरोधकांनी मात्र याचा विपर्यास करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही तसेच सत्ताधारी गटात एकमत राहिलेले नाही, वगैरे असा चुकीचा प्रचार सुरू केला. या संदर्भाने अधिक माहिती देताना नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी म्हटले आहे की, स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचे अधिकृत कळवून मगच ही बैठक तहकूब करण्यात आली आहे. त्याच बरोबर नंदुरबार जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानी वर चर्चा करण्यासाठी दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी देखील सभा आयोजित करण्यात आली आहे. वस्तुस्थिती माहित असतानाही जनतेमध्ये चुकीची माहिती प्रसारित करण्याचा जणू विरोधकांना आजार जडला असावा. सत्तापद मिळवायला आसुसलेल्या व्यक्ती वारंवार खोट्याचा आधार घेऊ लागतात आणि दुर्दैवाने तेच लक्षण आमच्या विरोधकांमध्ये दिसत आहे. हेच लोक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत संमत केलेल्या विकास कामांच्या विरोधात कोर्टात गेले केस दाखल केली तेव्हा यांना जनतेचा कळवळा होता की स्वतःचे राजकारण साधायचे होते? आज स्थायी समितीची सभा तांत्रिक कारणाने झालेली नाही म्हणून लगेचच जनतेच्या प्रश्नांवर बोलणारे आमचे हे विरोधक तद्दन ढोंगी वागत आहेत दुटप्पी वागत आहेत हे आजच्या प्रकरणातून पुन्हा एकदा उघड झाले. तरी लोकांनी अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करावे.
आमच्या सत्ताधारी गटातील सर्व सदस्य एकत्रच आहेत आणि राहतील, असाही विश्वास डॉक्टर सुप्रिया गावित यांनी व्यक्त केला.
प्रविण चव्हाण परिवर्तन 24 न्युज नंदुरबार