सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्मारकाचे सुशोभिकरण करावे ; सावता फुले फाऊंडेशनचे पालिकेला निवेदन

प्रविण चव्हाण
नंदुरबार-: ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त माळीवाडा परिसरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारक स्वच्छ व सुशोभिकरण करुन मिळावे, अशी मागणी सावता फुले फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष मनोज गायकवाड यांनी केली आहे.
तसे निवेदन पालिका मुख्याधिकारी पवन दत्ता यांना देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, नंदुरबार शहरात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे माळीवाडा परिसरात एकमात्र स्मारक आहे. दरवर्षी फुले दाम्पत्याच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त याठिकाणी जिल्ह्याभरातून समाज बांधव अभिवादनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
दि.३ जानेवारी स्त्री शिक्षणाच्या जननी आई सावित्रीबाई फुले यांची जयंती माळीवाडा परिसरात सर्व समाज बांधव उत्साहात व आनंदात साजरा करतात. सालाबादाप्रमाणे यंदाही सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
तरी दि.२ जानेवारी २०२५ पर्यंत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारक माळीवाडा परिसर पालिकेमार्फत स्वच्छ करुन पुतळ्यास रंगरंगोटी करुन सुशोभिकरण करण्यात यावे, अशी मागणी सावता फुले फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे.
यावेळी सावता फुले उपजिल्हाध्यक्ष यादवराव पाटील, ऍड.महेश माळी, सुरेश माळी आदी उपस्थित होते.