शक्ती,भक्ती आणि श्रद्धेचे केंद्र ठरणाऱ्या शिवधाम उद्यानाचे महाशिवरात्रीला लोकार्पण नंदुरबारात १ लाख रुद्राक्षांचे होणार वाटप; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार (प्रतिनिधी)- नगरपरिषदेच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या शिवधाम उद्यानाच्या लोकार्पण उद्या बुधवारी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर करण्यात येत असून,३ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. लोकार्पणाच्या निमित्ताने शिवभक्तांना उज्जैन येथील महाकाल मंदिरातील अभिषेक झालेले १ लाख रुद्राक्षांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
नंदुरबार शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या बाजूला साकारण्यात येत असलेल्या शिवधाम उद्यान लोकार्पणाची माहिती देण्यासाठी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी उद्यानात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक दीपक दिघे,अतुल पाटील उपस्थित होते. पुढे रघुवंशी म्हणाले, नंदुरबार येथे गेल्यावर्षी महाशिव पुराण कथाकार पं. प्रदीप मिश्रा यांनी शहरात शिवधाम उद्यानाची संकल्पना मांडली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा केला असता नगरविकास विभागाकडून उद्यानासाठी निधी प्राप्त झाला होता.
शिवधाम उद्यानमध्ये 16 फूट उंच शिवजींची मूर्ती बसवण्यात आलेली आहे. १२ ज्योतिर्लिंगांचे शिल्प उभारण्यात आले असून,मोठा त्रिशूलही बसवण्यात आले आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर झळाळून निघणार आहे.
शिवभक्तीची पर्वणी; भाविकांमध्ये उत्साह
महाशिवरात्रीनिमित्त शिवधाम उद्यानाच्या लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. बुधवार,गुरुवार व शुक्रवार तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. त्यामुळे भाविक भक्तांमध्ये उत्साहाला उधाण आलेले आहे.
सामूहिक महाआरती
बुधवारी महाशिवरात्रीला सायंकाळी ६ वाजता सामूहिक महाआरती करण्यात येणार आहे.यासाठी शहरातील ब्रह्मवृंदांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. गुरुवार दिनांक 27 रोजी भस्मारती होईल. शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेपासून उज्जैन येथील महाकाल मंदिरातील अभिषेक झालेले रुद्राक्षाचे वाटप करण्यात येणार आहे. याच ठिकाणी महाप्रसादाचे देखील वाटप होईल. साधारणता एक लाख रुद्राक्षाचे वाटप करण्यात येणार येणार असून भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.
शक्ती,भक्ती,श्रद्धेचे केंद्र
शिवधाम उद्यानमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई साकारण्यात आलेली आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी देखील बसवण्यात आली आहेत.शक्ती,भक्ती आणि श्रद्धेचे त्रिवेणी संगम ठरणाऱ्या शिवधाम उद्यानातून प्रखर शिवभक्ती जागृत होणार आहे.
सभामंडपाची व्यवस्था अन् स्वतंत्र कक्ष
तीन दिवसीय चालणाऱ्या कार्यक्रमासाठी उद्यानाच्या बाहेर मंडपाची व्यवस्था करण्यात येईल.भाविकांची अधिकची संख्या लक्षात घेता महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात करण्यात येऊन बॅरिकेटिंग करण्यात येईल.
प्रविण चव्हाण नंदुरबार