आष्टे येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

आष्टे (ता. नंदुरबार) – ग्रामपंचायत आष्टे आणि जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळेच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम उपसरपंच कविता शेवाळे आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षी ढोडरे यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमात पत्रकार नारायण ढोडरे यांनी समाज सुधारक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांविषयी मार्गदर्शन केले. तसेच, ग्रामपंचायत अधिकारी देवेंद्रसिंह राजपूत यांनी महिलांना मिळणाऱ्या शासकीय योजना आणि महिला सुरक्षेबाबत माहिती दिली.
महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत आष्टे यांच्या 15वा वित्त आयोग निधीतून जिल्हा परिषद मराठी शाळा आष्टे येथे 4 आणि ओझर्दे शाळेस 2 संगणक भेट देण्यात आले.
या कार्यक्रमास सरपंच किशन सोनवणे, उपसरपंच कविता शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षी ढोडरे, अंगणवाडी शिक्षिका वंदना शेवाळे, पत्रकार नारायण ढोडरे, ग्रामपंचायत अधिकारी देवेंद्रसिंह राजपूत, मुख्याध्यापिका मीरा गवळी, शिक्षक दिनेश पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी राकेश अहिरे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटातील महिला, उमेद संस्थेच्या आय.सी.आर.पी. महिला तसेच महिला पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दिनेश पाटील यांनी केले.
या उपक्रमातून महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रविण चव्हाण, नंदुरबार