नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर

नंदुरबार
पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांना उत्कृष्ट तपासाबद्दल तर एक पोलीस अंमलदार यांना उत्कृष्ट अभिलेखाबद्दल पदक जाहीर..
महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनीय/प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक, पोलीस पदक, पोलीस शौर्य पदक व पोलीस महासंचालकाचे बोधचिन्ह/सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्राने सन्मानित करण्यात येते. त्या अनुषंगाने सन 2024 या वर्षाकरीता उल्लेखनीय सेवेबद्दल महाराष्ट्रातील तब्बल 800 पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.
पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर झालेल्यांपैकी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांचे नाव असुन त्यांनी परभणी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणुन कार्यरत असतांना एक क्लिष्ट गुन्हा उघड करुन गुन्हयाचा उत्कृष्ट तपास केला होता. तसेच सदर गुन्हयात आरोपींना शिक्षा झाली असल्याने त्यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. तसेच पोलीस हवालदार बापू निंबा वाघ यांना 15 वर्षाच्या सेवेचा अभिलेख उत्तम राखल्याबद्दल सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.
दिनांक 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनी पोलीस मुख्यालय नंदुरबार येथे होणाऱ्या पथसंचालनावेळी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना नंदुरबार जिल्हयाचे पालकमंत्री यांचे हस्ते पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.