अविश्वास प्रस्तावकडे जिल्ह्याचे लक्ष लागुन, डॉ सुप्रिया गावितांचा अध्यक्ष पदावरुन पायउतार होणार?
खांडबारा (प्रतिनिधी)
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांची जेष्ठ कन्या डॉ हिना गावित यांचा लोकसभेत पराभव केल्यानंतर, आता विरोधकांनी त्यांचा मोर्चा हा त्यांच्या दुसर्या कन्येकडे वळवला आहे. विरोधकांनी आता नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या विरोधात नंदुरबार जिल्हा परिषदेत अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. डॉ सुप्रिया गावित ह्या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. 20 सदस्यांनी मनमानी कारभाराचे उदाहरण देत त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.विशेष म्हणजे या अविश्वास प्रस्तावात काही सत्ताधारी, तर काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.त्यामुळे येणाऱ्या 31 जुलै 2024 याबाबत विशेष सभा घेतली जाणार असून, अविश्वास प्रस्तावावर मतदान होईल. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांच्या विरोधात अविश्वास पारीत करण्यासाठी 44 संख्याबळ आवश्यक आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये 56 सदस्य संख्या असून आदिवासी महिला अध्यक्ष असल्याने त्यांच्या विरोधात 3/4 मत आवश्यक असल्याने यावर आता नेमके काय होते ? याकडे संपूर्ण जिल्हावासियांच्या नजरा लागून आहेत.
सुकदेव वळवी, खांडबारा प्रतिनिधी